पाहुनी शोभा नभाची, भाळले दर्पण बिलोरी
गोल टिकली रोज दिवसा आणि रात्री चंद्रकोरी
तूच आता सांग सूर्या, पाकळी खुलते कशी ते
विनवतो आहे कधीचा, 'ती' तरीही पाठमोरी
एकदाचे स्पष्ट झाले: "पाळणा हलणार नाही"
मग गळ्याचा फास झाली, पाळण्याची तीच दोरी
सोडला निःश्वास तेव्हा, अर्धमेल्या आठवांनी
कोंडलेल्या काळजाची, खोलली जेव्हा तिजोरी
पाहिले फुलपाखरा मी, रस फुलांचा शोषताना
मुखवटा घालून ये तू, पकडली जाईल चोरी
● विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
Write a comment ...