चंद्रतारका, फुलाबिलांचे क्लीशे टाळू (गझल)

चंद्रतारका, फुलाबिलांचे क्लीशे टाळू
प्रेमनदीच्या पात्रामधली बदलू वाळू
काही, काही विशेष नाही आपल्यामधे
सांग जगाच्या डॉल्बीदेखत कसे खळाळू?
नाही पर्वा चिंध्या चिंध्या होण्याची पण
तुझी स्तब्धता डोळ्यांमध्ये कुठवर पाळू?
मिळेल तितक्या धारांसंगे लावू पैजा
जमेल तितक्या परंपरांचे शिक्के जाळू
आज स्वतःच्या दुःखापायी लावू गाणी?
की दुनियेच्या मौजेखातर अश्रू ढाळू?

- विश्वजीत गुडधे

Write a comment ...

Write a comment ...