"Belles-lettres": Lonely Railway Tracks & the Moon

In "Belles-lettres", a style from French Literature, the artistic piece will revolve around the above given image of lonely Railway Tracks at night.

तिन्हीसांजेची वेळ. क्षितिजावरून डोकावू पाहणारा चंद्र. दिवसभराचा शीण घालवून चंद्राच्या शीतल छायेत पहुडलेले रूळ. अगदी निपचित पडून आहेत बघा दोघेही. दूरवर कुठेतरी होणारं एक मिलन दृष्टिक्षेपात; पण तेही आभासी! कारण त्यांचा मिलाफ झाला तर त्यांच्या आधाराने चालणारी रेल्वे कोलमडून पडणार ना! दुसऱ्यांच्या उत्कर्षासाठी अविरत चालत राहण्याचा त्यांचा 'सोबतीचा करार'. शहर, खेडे, बोगदा...अगदी कुठेच भंग न होणारा एक अलिखित करार.

पौर्णिमेच्या चंद्राची कांती अवघ्या नभावर पसरलीय. त्या शुभ्र किरणांनी आकाशच कवेत घेतलेलं आहे. डोळ्यांवर एकदम लख्ख प्रकाश पडल्याने झाडेसुद्धा हळूहळू डोळे मिचकावत त्या चांदोबाकडे एक कटाक्ष टाकताहेत. इकडे वाऱ्याच्या झुळूकीसवे काहींनी डोलायलाही सुरुवात केली आहे. एक विहंगम दृश्य. पापण्यांनी अलगद टिपून मेंदूच्या हार्ड डिस्कमध्ये कायमस्वरुपी कैद करून घ्यावं असं.

आणि त्या रुळांना बघा किती हुरूप आलाय याचा. त्या तेजस्वी किरणांनी यांचंही रूप उजळून निघालेलं दिसतंय. श्वेत रंगाच्या मुलाम्याने काहीसे रुपगर्विष्ट झालेले. तसंही सूर्यापेक्षा त्यांचं चांदोबाशीच जास्त पटतं. कारण दिवसभर उन्हाने पोळून त्यांच्या अंगाची लाही-लाही होते. आणि वरून सावळ्या रूपाचा बट्टा. आता या माणसांना कोण सांगणार की मेलानीन वरून सौंदर्य ठरवत नसतात म्हणून. मुळात सौदर्याच्या व्याख्याच हुकलेल्या आहेत आपल्या. असो! इस 'रूट' पर फिर कभी बात करेंगे. पण चंद्र मात्र त्यांना त्यांच्या सौंदर्याची जाणीव करून देतो. चंद्रालाही त्याच्या काळ्या डागांमुळे हिणवणारे आपल्याकडे आहेतच की. त्यामुळे त्याच्याशी सलगी वाटणे साहजिकच आहे. तसंही रूप न्याहाळण्याची संधी पंधरवड्यात एकदाच तर मिळते. त्यामुळे त्या दिवसाची खासियत काही औरच असते. अमावस्येच्या रात्री मात्र पार हिरमोड होतो या बिचाऱ्यांचा.

असाच एक सोबतीचा करार आहे तो रूळ आणि रेल्वेच्या सोबतीचा. रेल्वेला धावण्यासाठी रूळ पायवाट तयार करून ठेवतात आणि त्या पथावर मार्गक्रमण करत रेल्वे आगेकूच करते. एवढे भारीभक्कम ओझे त्या इवल्याशा जीवांना कसे पेलवत असणार? पण ते निव्वळ ओझेच असते का ? मुळीच नाही. कुणाला दूरवरच्या आप्तेष्टांना भेटण्याची ओढ, कुणाची नोकरीसाठी वणवण, कुणाचं ऑपरेशन, कुणाची छानशी सहल...तर कुणाची दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सारखी फिल्मी प्रेमकहाणी...प्रत्येकाची न्यारीच दुनिया. या सर्व गोष्टी एकाच पोतडीत समेटून घेऊन जाणाऱ्या रेल्वेला कोण ओझं म्हणणार ? उलट तो तर एक खजिनाच आहे. आणि या खजिन्याचा सारथी होण्याचा बहुमान या रुळांना मिळतो आहे. मग त्यात कसले दुःख? एखाद्या म्हाताऱ्या आजीला तिच्या लेकीकडे पोचवून दिल्यावर किती समाधान लाभत असेल ना या दोघांनाही? भारतासारख्या देशात तर रेल्वे जीवनवाहिनीच आहे. एक दिवस जर का मुंबईची लोकल अडखळली तर त्याचे काय परिणाम होतील, याची कल्पना न केलेलीच बरी.

रेल्वे, झाडे आणि चांदोबा या त्रिकुटाने अनेकांचं बालपण मोहरून टाकलेलं आहे. माझंसुद्धा! तिकीट काढली रे काढली की कधी एकदाचं त्या खिडकीपाशी जावून बसतो अन कधी नाही असं वाटत राहायचं. कारण तिथे चांदोमामा भेटायचा ना!! त्यासाठी आमचा खास रात्रीच्या प्रवासाचा आग्रह असायचा. एकदाची रेल्वे चालू झाली की त्याच्यासवे लपंडावाचा खेळ चालायचा. खिडकीतून त्याच्याकडे एकटक बघत राहायचो. कितीही दूर गेलो तरी तो ढिम्म मात्र तिथेच दिसायचा. याचं मात्र फार कौतुक आणि कुतूहल वाटायचं तेव्हा. जणू काही रेल्वेच रिंगण घालतेय त्याच्याभोवती. पण पुढच्याच क्षणाला त्याचं दर्शन व्हायचं. "खिडकीतून हात बाहेर काढू नकोस रे...." अशी बाबांची सक्त ताकीद होती म्हणून. नाहीतर मी चांदोबालाही मुठीत बंद करून दाखवलं असतं. आणि फार मोठी खंडणी वसूल केली असती त्याला सोडायच्या बदल्यात. रेल्वेत फावल्या वेळेत पुस्तके वाचण्याची अनेकांना सवय असते. मी मात्र आपला निसर्गच वाचत बसायचो नेहमी. त्याने मला बरंच काही शिकवलं.

रेल्वेचा प्रवास आता बराचसा कमी झालाय. किंबहुना नाहीच्या बरोबरीचाच !! त्यामुळे आता चांदोमामा कसा दिसत असेल कुणास ठाऊक! केस पिकले असतील का त्याचे? आणि दात शाबूत असतील का ? की आताही तसाच चिरतरुण असेल ? खरंच, रेल्वेच्या आठवणींनी मन आजही ओलेचिंब होते. किती छान-छान आठवणी अगदी सुखरूप आहेत ना मनाच्या कोंदणात ?

पण कधी-कधी रेल्वेबद्दल अवांछित असं काही कानावर पडतं तेव्हा मात्र हृदय पिळवटून निघतं. कुठेतरी अचानक एखादी गाडी रुळावरून खाली येते आणि अनर्थ होतो. जीवितहानी होते. वेळेवर मदतीचा हात पोहचू न शकल्याने अनेकांचा नाहक जीव जातो. बऱ्याचदा याची कारणे नैसर्गिक असतात. तर कधी-कधी एखाद्या क्षुल्लक चुकीमुळेही अपघाताचा धोका संभवतो. काही भरकटलेल्या लोकांच्या अनिष्ट कृत्यांमुळे अनेकदा हसत्या-खेळत्या चेहऱ्यांवर अश्रुंचे ओघळ दिसू लागतात. मग ती गोध्राची दंगल असो वा २६/११ सारखा दहशतवादी हल्ला. रेल्वे स्टेशनवर निष्पाप लोकांचा जीव घेतला गेला. कुणी अनाथ झाले, कुणी अपंग तर कुणाचं सर्वस्वच भस्मसात झालं या द्वेषाच्या ज्वाळांमध्ये. नुसती राखच राख. पण तरी जीवाची बाजी लावून कसाबला पकडणारे करकरे, साळसकर आणि ओंबळेंसारखे या मातीचे सुपुत्र समर्थ आहेत या जनतेचं आणि पर्यायाने रेल्वेचं रक्षण करायला. म्हणूनच आजही ती निर्धास्तपणे धावते आहे.

आयुष्यातील खडतर वाटांवर उद्भवणाऱ्या समस्यांपुढे नांगी टाकत आपल्या जीवाचं बरं-वाईट करायला निघालेले रेल्वेखाली जीव द्यायला येतात तेव्हा हा धीरगंभीर रूळही हळहळतो. रेल्वे यायच्या आधी त्याला समजावून सांगत परत धाडण्यासाठी ते धडपडत असतात. अशावेळी माणसासारखं त्यांनाही बोलता यायला हवं होतं ना? आणि अशाच एखाद्या कोवळ्या जीवाला अगतिकपणे ती रेल्वे चिरडून जाते तेव्हा तिच्या जिवाचीही घालमेल होत असते. नेहमी वाट दाखवणारी रेल्वे वाटा बंद करण्याचं माध्यम कशी काय होवू शकते? अशाच काही जखमांचे व्रण घेवून रूळ आयुष्यभर चालत राहतात.

पण काहीही झालं तरी रेल्वे अशीच निरंतर चालत राहणार. माणसांना माणसांशी जोडणारी साखळी आहे ती. ही साखळी मोठी होतच जाणार. काटे अंथरलेल्या जागेतही हे रूळ वाट शोधून काढणार आणि रेल्वे निमुटपणे त्यावर चालत राहणार. त्यांचा तसा करारच आहे सोबतीचा. आणि या करारात त्यांनी माणसांनाही सामावून घेतलेले आहे. आता तो पाळण्याची जबाबदारी आपल्यावर आहे बरं का ! तेव्हा मनसोक्त मुशाफिरी करूया! सोबतीला आपला सवंगडी आहेच. कोण ? चांदोमामा !!

- विश्वजीत दीपक गुडधे

Write a comment ...

Write a comment ...