Revisiting the Melody : Itti Si Hansi

"इत्ती सी हंसी
इत्ती सी ख़ुशी
इत्ता सा टुकड़ा चाँद का
ख्वाबों के तिनकों से
चल बनाएं आशियाँ"

हसरा चेहरा आणि आनंदी मन. बस्स, एवढेच ! आणखी काय हवं असतं एखाद्या सुखी घराला ? या दोहोंचा मिलाफ असेल तर स्वप्नातल्याप्रमाणे अगदी चंद्रावरही घर निर्माण केल्या जाऊ शकतं. पण इवल्याशा सुखात आणि आनंदात आजकाल कुणाचं भागतं ? आपल्याला सर्वकाही 'भरघोस' हवं असतं. छोट्या-छोट्या गोष्टींतूनही आनंद घेत राहणारं घरच खऱ्या अर्थाने 'घर' ठरतं. चिऊताई कशी पेंढ्याची एक-एक काडी गोळा करून तिचे सुंदर घरटे तयार करते. ते घरटे काड्यांचे जरी असले तरी देखणे असते. त्याला कुठल्याच भव्यतेची गरज नसते. साधेपणा हेच त्याचे सौंदर्य.

अशाच एका साध्या आणि आनंदी घराचे स्वप्न रंगविणारे हे गीत आहे "बर्फी" या चित्रपटातील. इथे घर म्हणजे नुसते चार भिंतींचे कुंपण नसून निसर्ग हेच आपले घर असा व्यापक दृष्टिकोण या गीतामध्ये मांडलेला आहे. गीतकार स्वानंद किरकिरे यांच्या हृदयस्पर्शी शब्दांना स्वरसाज चढविला आहे श्रेया घोषाल आणि निखिल पॉल जॉर्ज या जोडीने. मुक-बधीर 'बर्फी'(रणबीर कपूर) आणि स्वमग्नता या आजाराने ग्रस्त असणारी 'झिलमिल' (प्रियंका चोप्रा) हे प्रेमीयुगुल आपल्या घराची कल्पना रंगवितात. एकाला बोलता येत नाही आणि दुसऱ्याला नीटसे व्यक्त होता येत नाही. तरीही त्यांचा संवाद चालू असतो. कारण मनाला कोणत्याच भाषेची गरज नसते. या मनाचे त्या मनाला चटकन कळून जाते. आपल्या भावी आयुष्याबद्दल ते म्हणतात...

"दबे दबे पाओं से
आये हौले हौले जिंदगी
होठों पे कुंडी चढ़ाके
हम ताले लगा के
चल गुमसुम तराने
चुपके चुपके गायें"

कोण जाणे केव्हा सुख नामक पाहुणा येवून आपले दार ठोठावेल. आपण त्या पाहुण्याच्या स्वागतासाठी तयार राहायला हवं. प्रत्येक क्षणातून मिळेल तेवढा आनंद कवेत घेऊया, असे ते दोघे ठरवितात. त्यांच्या बोलण्यावर, व्यक्त होण्यावर मर्यादा असल्या तरी त्यांचा संवाद अव्याहतपणे सुरूच असतो. बोलण्याच्या असमर्थतेसाठी वापरलेली दाराची कडी आणि कुलूपाची प्रतिमा गीतकाराची वैचारिक ऊंची दर्शविते. कडी-कुलूप म्हणजे सर्वकाही बंद. संपर्कच नाही. आतील गोष्ट बाहेर नाही आणि बाहेरची आत नाही. पण नियतीने ओठांना कडी-कुलूप लावले असले तरी हे कलंदर गुपचुप गाणी गावू इच्छितात. जगाला विसरून आपल्याच धुंदीत राहू इच्छितात. त्यांना कशाची फिकीर नाही. फक्त ते दोघेच.

"आधी आधी बाट ले
आजा दिल की ये ज़मीन
थोडा सा तेरा सा होगा
थोडा मेरा भी होगा
अपना ये आशियाँ"

मला सर्वाधिक आवडलेले हे कडवे. किती सुंदर विचार मांडला आहे या ओळींमध्ये. हृदयाच्या जमिनीची अर्धी-अर्धी वाटणी केली, एकमेकांना हृदयात वसविले की झाले....घर तयार. दुसऱ्या कुठल्या आश्रयाची गरजच पडणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत तोच कायमस्वरूपी निवास. नाहीतर लोक वर्षानुवर्षे घरासाठी, जमिनीच्या तुकड्यासाठी भांडत बसतात. "मला इतका हिस्सा पाहिजे", असा आग्रह धरतात. सर्व भांडणतंटे, द्वेषभावना सोडून एकमेकांवर प्रेम करायला शिका, असा संदेशही या ओळींमधून दिला गेलाय.

"ना हो चार दीवारें
फिर भी झरोखें खुले
बादलों के हो पर्दे
शाखें हरी, पंखा झले"

झिलमिल आणि बर्फी या दोघांनी निसर्गालाच आपले घर मानले आहे. ही झाडे, वेली, टेकडी, दऱ्या, नदी, मेघ, पाखरे हेच त्यांचे सोबती. त्यांना स्वतःला चार भिंतींनी बंदिस्त करायचे नाही आहे. त्यांच्यासाठी आकाश हेच छप्पर आणि हिरवी शाल पांघरलेली जमीन हा त्यांचा बिछाना. छोट्या टेकडीसोबत ते लपंडाव खेळतात. त्या टेकडीवरून क्षितिजाला न्याहाळतात. नदीच्या अवखळ पाण्याचा ते आनंद लुटतात. त्यांच्या खिडकीतून सर्व काही दिसतं. उंच आकाशी उडणारे पक्षी असोत किंवा चांदणे, कोणतीच गोष्ट त्यांच्या कक्षेबाहेर नाही. खिडक्यांना काळ्याभोर मेघांचे पडदे असावेत, अशी त्यांची इच्छा आहे. या पडद्यांची उघडझाप करून त्यांना नभाशी हितगुज करायचंय. आकाशी विहरणाऱ्या पाखरांशी गुजगोष्टी करायच्या आहेत. पंख्याची उणीव झाडांच्या हिरव्या फांद्या भरून काढतात. सोबतीला गारगार वारा. या ओळी ऐकल्या की लगेच डोळ्यांदेखत चित्र उभं राहतं. क्षणातच मन एखाद्या फुलावर जातं किंवा फुलपाखराचा पाठलाग करतं. मनाला प्रफुल्लीत करणाऱ्या ओळी.

"ना हो कोई तकरारें
अरे मस्ती, ठहाके चलें
प्यार के सिक्कों से
महीने का खर्चा चले"

त्या दोघांना जीवनात कुठलीही तक्रार, गाऱ्हाणे नको आहे. नाराजीचा सूर त्यांना नापसंत आहे. निराशा नावाचा शब्द त्यांनी कायमचा गाळून टाकलाय. त्यांना हवाय तो केवळ निखळ आनंद. त्यांना स्वच्छंदपणे आयुष्याचा प्रत्येक क्षण जगायचाय. सोबतच मस्ती, खोड्याही करायच्या आहेत. कितीही बिकट परिस्थिती किंवा आव्हान समोर उभे ठाकले तरी त्याला हसत-हसत तोंड द्यायचे आहे. एकमेकांवर नितांत प्रेम असायला हवे. प्रेम असेल तर त्या प्रेमाच्या नाण्यांनी महिन्याचा खर्चही भागविता येतो हे ते दाखवून देतात.

आयुष्यात छोट्या-छोट्या गोष्टींतून आनंद कसा मिळवायचा ते हे गाणं शिकवितं. निसर्गाशी जवळीक निर्माण करतं. प्रेम करायला शिकवितं. मुकबधीर आणि ऑटिझमने ग्रस्त असणाऱ्यांच्या दुनियेशी अवगत करतं. अत्यंत विषम परिस्थितीतही त्यांच्या चेहऱ्यावर असणारं गोड हास्य जगण्याची प्रेरणा देतं. एका छोट्याशा गाण्यात सुंदर भाव, विचार, कल्पना तसेच संदेश प्रभावीपणे व्यक्त करणे हे मोठे जिकीरीचे काम असते. गीतकार स्वानंद किरकिरे यांनी खुबीने ते कार्य पार पाडले आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच. श्रेया घोषाल हिच्या गोड आवाजाला निखील पॉल जॉर्ज याची साथ लाभली आहे. संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांचे संगीत इतके सुंदर आहे की गाण्याच्या तालावर आपली मान आपसूकच डोलत राहते. व्हायोलीन, ड्रम आणि बासरी या वाद्यांचा केलेला चपखल उपयोग गाण्याला आणखी सुंदर बनवितो.

या गाण्याचे चित्रीकरणही तितकेच उत्तम झाले आहे. झिलमिलला हसविण्यासाठी नानाविध करामती करणारा बर्फी, फुलपाखराला बोटांत पकडू पाहणारी झिलमिल, तिचे निखळ हास्य, एकमेकांच्या संगतीत खुश असणारे बर्फी व झिलमिल हे सर्व बघायला खूप मजा येते. पूर्वीच्या तुलनेत आताच्या काळात चांगली गाणी ऐकायला कमी मिळतात, हे वाक्य नेहमीच आपल्या कानावर पडत असते. जे बऱ्याच अंशी खरेही आहे. पण अशी हृदयस्पर्शी गाणी ऐकली की आपली शंका दूर होते. नव्या पिढीकडूनही छान-छान गाणी येत आहेत. एखाद्या चेहरा पाडून बसलेल्या उदास व्यक्तीला हे गाणे ऐकवले तर त्याचा चेहरा जरूर खुलेल इतके सामर्थ्य या गाण्यात नक्कीच आहे.

• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.

Vishwajeet Gudadhe

Poet, Lyricist