प्रश्न हा नव्हे की (गझल)

प्रश्न हा नव्हे की बुडलो वा तरलो आहे का ?
प्रश्न असा की घराबाहेर पडलो आहे का ?
याच्या त्याच्या चुकांना किती वाचत बसलो पण
स्वतःच्या तरी चुकांतून धड शिकलो आहे का ?
काळजी कशी वाटत नाही मागे पडण्याची ?
मी शेवटच्या बाकावरती बसलो आहे का ?
येऊच नये आता कुठल्या हाताने इथवर
आठवणींच्या मलब्याखाली दबलो आहे का ?
काय खुबीने एक लख्खसा हुंदका दाबला
काळोखाचा मित्र वगैरे बनलो आहे का ?
- विश्वजीत गुडधे

Write a comment ...

Write a comment ...